वाई तालुक्यातील दत्तनगर येथील प्रतीक नंदकुमार कदम (वय 28) हा युवक रविवारी सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाला असून त्याच्या शोधासाठी वाई पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत त्यांचे वडील नंदकुमार कदम यांनी वाई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रतीक हा सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास कोणालाही काहीही न सांगता घरातून आपल्या अॅक्टिव्हा दुचाकीवरून निघून गेला. बराच वेळ होऊनही तो घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर मित्रमंडळी, नातेवाईक आणि परिचितांकडे शोध घेतला असता त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
दरम्यान, प्रतीकची दुचाकी व्याहळी येथे मुख्य कॅनॉल जवळ आढळली. गाडीमध्येच त्याचा मोबाईल आढळला यमुळे चिंतेत भर पडली आहे. त्यानंतर नातेवाईकांनी मुख्य कॅनॉल परिसरात शोधमोहीम राबवली. मात्र सायंकाळपर्यंत प्रतीकचा कोणताही मागमूस लागला नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
प्रतीक कदम याचे वर्णन असे : उंची सुमारे 5 फूट 6 इंच, सावळा वर्ण, मध्यम बांधा, सरळ नाक, लहान केस. घरातून बाहेर पडताना त्याने निळ्या रंगाचा टी-शर्ट व पॅन्ट परिधान केली होती.
प्रतीक हा सन 2015 पासून मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांकडून युवकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ वाई पोलीस ठाण्याशी किंवा त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.











