वाई प्रतिनिधी : वाई तालुक्यातील ओझर्डे गावातील पाणीपुरवठा योजनेवरील वाढत्या वीज बिलाच्या समस्येवर आरंभ संस्था, नवी मुंबई यांच्या माध्यमातून कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आला आहे. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शोभा मूर्ती यांच्या पुढाकारातून गावातील माळ आळी येथील आडावर सौरऊर्जेची सुविधा उभारण्यात आली असून त्यामुळे ग्रामपंचायतीचा दरमहा होणारा वीज खर्च आता मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
आरंभ संस्थेच्या माध्यमातून यापूर्वीही वाई तालुक्यातील अनेक शाळांना विविध भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामीण भागातील विकासकामांसाठीही संस्थेचे मोलाचे योगदान राहिले आहे. ओझर्डे येथे भेटीदरम्यान श्रीमती शोभा मूर्ती व मान. कविता सिप्रा यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून गावातील विकासकामे व गरजांचा आढावा घेतला. यावेळी पिण्याच्या पाण्याच्या योजनेवरील वाढत्या वीज बिलाची समस्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत हा सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आरंभ संस्थेचे आभार मानले. या कामात जय हिंद सोलरचे महेश घरटे, मयूर डिसिल्वा व भरत सणस यांचे विशेष योगदान लाभले. कमी कालावधीत दर्जेदार काम पूर्ण केल्याबद्दल महेश घरटे यांचेही कौतुक करण्यात आले.
या प्रकल्पासाठी आरंभ संस्था समन्वयक शेखर जाधव, अभियंता गणेश कोदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच विजयसिंह दादा पिसाळ, विक्रमसिंह पिसाळ, अण्णासो फरांदे, विश्वजीत पिसाळ, अविनाश फरांदे, सरपंच शेखर फरांदे, केशव पिसाळ, एल. डी. फरांदे, विशाल फरांदे, रवींद्र कुंभार तसेच ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदविला. ग्रामसेवक संजय वर्णेकर, हणमंत कदम व प्रमोद सोनवणे यांनीही सहकार्य केले.
यावेळी बोलताना श्रीमती शोभा मूर्ती यांनी संस्थेमार्फत उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा योग्य वापर व देखभाल करण्याचे आवाहन केले. तसेच गावाच्या विकासासाठी विजयसिंह दादा पिसाळ यांचे योगदान कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमाबद्दल ओझर्डे ग्रामस्थांच्या वतीने आरंभ संस्था व श्रीमती शोभा मूर्ती यांचे विशेष आभार मानण्यात आले.











