मुंबई क्राईम ब्रांच आणि ‘विश्वास नांगरे-पाटील’ बोलत असल्याचे भासवून ईडीची खोटी नोटीस पाठवून आणि अटकेची भिती दाखवून सुप्रीम कोर्टाच्या फंडामध्ये आम्ही सांगतो तेवढी रक्कम जमा केल्यास अटक थांबवितो असे सांगून एका व्यक्तीची १९ लाख १ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.
ही घटना २९ नोव्हेंबर २०२५ ते ८ डिसेंबर २०२५ दरम्यान दिघी येथे ऑनलाइन पद्धतीने घडली. या प्रकरणी एका पुरुषाने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विविध मोबाईल क्रमांक आणि बँक खाते धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांना व्हाईस, व्हॉट्सअॅप, ऑडिओ कॉल केले. मुंबई क्राईम ब्रांच मधून बोलत असल्याचे सांगितले. आधार कार्डचा गैरवापर झाला आहे. त्यावरुन विविध बँकेचे एटीएम कार्ड बनविण्यात आले आहेत. लोकांची फसवणूक करणारी तुमची एक टोळी असल्याची माहिती मिळाल्याचे आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांना सांगितले. तुमच्या खात्यावरुन मनी लाँड्रिंग होत असल्याचीही माहिती असल्याचे सांगतून त्यांना ईडीची खोटी नोटीस पाठवून अटकेची भीती दाखवण्यात आली. याबाबत कोणाला सांगितले तर तत्काळ अटक केली जाईल आणि सोसायटीमधील सर्व लोकांसमोर तुम्हाला घेऊन जाऊ अशी भिती दाखविली. त्यानंतर एका नंबरवरुन फोन करुन ‘विश्वास नांगरे-पाटील’ बोलत असल्याचे भासविले. सुप्रीम कोर्टाच्या फंडामध्ये आम्ही सांगतो तेवढी रक्कम जमा केल्यास अटक थांबवितो असे फिर्यादीच्या वडिलांना सांगितले. अटकेची भिती दाखवून १९ लाख १ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करत आहेत.
खोट्या स्वाक्षऱ्या करुन जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम
पुनावळे येथील जमिनीच्या मोजणीवेळी फसवणूक करून आणि बनावट स्वाक्षऱ्या करून बेकायदेशीर बांधकाम केल्याच्या आरोपावरुन दोघांविरोधात रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीची जमीन विकत घेण्याचे सांगून समजुतीचा करारनामा केला होता. मात्र, मोजणीच्या वेळी फिर्यादी हजर नसताना त्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून जमिनीची हद्द बदलण्यात आली. या मोजणीचा आधार घेऊन आरोपींनी फिर्यादीच्या जागी बेकायदेशीर बांधकाम करून त्यांची फसवणूक केली. रावेत पोलीस तपास करत आहेत.
बनावट नोटरी कागदपत्रे;
एकाला अटकहिंजवडी परिसरात बनावट स्टॅम्प पेपर आणि नोटरी कागदपत्रे तयार करून शासनाची आणि नागरिकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. ही घटना एप्रिल २०२५ दरम्यान हिंजवडी येथील एका ई-सुविधा केंद्रामध्ये घडली. या प्रकरणी पोलीस शिपाई अजिनाथ सावंत यांनी फिर्याद दिली आहे. सिमांता कामीनी कुमार दास (३२, नेरे, दत्तवाडी, मुळशी; मूळ रा. पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मूळ स्टॅम्प पेपरची रंगीत छायांकित प्रत काढून त्याद्वारे बनावट नोटरी करारनामे तयार केले. या कागदपत्रांचा वापर करून कंपनीचे ओळखपत्र मिळवणे, बँक खाते उघडणे आणि गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी उपयोग केला गेला. अशा प्रकारे आरोपीने १० नागरिकांची सुमारे २० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.












