वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे
मुगाव, दि. ७ : जि.प. प्राथमिक शाळा मुगाव येथे ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी ‘बाल बाजार’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात पार पडला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानासह विक्री-खरेदीची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत या उपक्रमाला विशेष रंगत आणली. या शालेय बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, ताजी फळे तसेच किराणा मालाच्या विविध वस्तू विक्रीसाठी आकर्षक पद्धतीने मांडल्या होत्या. विद्यार्थ्यांनी स्वतः स्टॉल उभारून वस्तूंची मांडणी केली आणि ग्राहकांशी संवाद साधत विक्री केली.

बाजार पाहण्यासाठी व खरेदीसाठी मुगाव गावातील पालक, ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. त्यामुळे शाळेच्या परिसरात उत्साही व आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, पैशांची देवाण-घेवाण, वस्तूंची किंमत समजून घेणे, ग्राहकांशी संवाद साधणे तसेच विक्री-खरेदीची पद्धत यांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले. पुस्तकी शिक्षणाबरोबरच जीवनोपयोगी कौशल्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकता यावीत हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

या अनुभवातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली तसेच श्रमाचे महत्त्व आणि पैशाचे मूल्य समजून घेण्याची संधी मिळाली. चिखली केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ. निर्मला भांगरे मॅडम यांच्या प्रेरणेतून तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना थोरवे आणि उपशिक्षक श्री.दत्तात्रय पडळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य नियोजन, वस्तूंची मांडणी, विक्रीची पद्धत आणि व्यवहार कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले.

या बाल बाजारास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व माता-पालक, गावातील ग्रामस्थ तसेच महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. तसेच व्याहळी कॉलनी गावच्या सरपंच सौ. सुजाता कांबळे व उपसरपंच सौ. सविता थोरवे यांनीही भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुगाव येथील जि.प. प्राथमिक शाळा ही परिसरातील उपक्रमशील, प्रगत व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी येथे सातत्याने विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात.

शिक्षकांचा समर्पित दृष्टिकोन, विद्यार्थ्यांचा उत्साह आणि पालकांचा सक्रिय सहभाग यामुळे ही शाळा परिसरात प्रेरणादायी शैक्षणिक केंद्र म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. शनिवार, दि. ७ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेला ‘बाल बाजार’ उपक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच जीवनातील व्यवहाराचे मौल्यवान धडे मिळाल्याची भावना पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केली.












