घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणाची पावणेसहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध मांजरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत एका तरुणाने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३८ वर्षीय तरुण मांजरी भागात राहायला आहे.
सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. घरातून ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगले पैसे मिळतील. एका हाॅटेलला दर्शक पसंती (व्ह्यूज) मिळवून द्यायची आहे, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्याला जाळ्यात ओढले.त्यानंतर चोरट्यांनी त्याला पैसे गुंतविण्यास सांगितले. गेल्या महिनाभरात चोरट्यांच्या खात्यात तरुणाने पाच लाख ७५ हजार रुपये जमा केले.
पैसे जमा केल्यानंतर जास्त परतावा मिळेल, असे सांगण्यात आले होते. तरुणाने चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे दिसून आले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आाल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम तपास करत आहेत.












