पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वरदाडे येथे रिंग रोडच्या कामादरम्यान घडलेल्या दुर्घटनेत एका तरुण ऑपरेटरचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.विजय कुमार असे मृत तरुणाचे नाव आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रिंग रोडच्या बांधकामाचे काम सुरू असताना विजय कुमार हा क्रेनवर चढत होता.
यावेळी त्याने कोणत्याही प्रकारचे सुरक्षात्मक साधन वापरले नव्हते. विशेषतः लाइफ जॅकेट किंवा अन्य सुरक्षा उपकरण नसताना तो शिडीवरून वर चढत असताना त्याचा पाय घसरला. त्यामुळे तो थेट सुमारे ४० फूट खोल नदीपात्रातील पाण्यात कोसळला.संबंधित तरुणाला पोहता येत नसल्याने तो पाण्याबाहेर येऊ शकला नाही.
काही क्षणातच तो पाण्यात बुडाला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, हवेली आपत्ती व्यवस्थापन विभागाचे बचाव पथक तसेच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने शोधमोहीम राबवून काही वेळातच मृतदेह पाण्याबाहेर काढला.
दरम्यान, या दुर्घटनेमुळे कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. योग्य सुरक्षात्मक साधनांचा वापर केला असता ही दुर्घटना टाळता आली असती, अशी चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. पोलिसांकडून घटनेची पुढील चौकशी सुरू आहे.












