परिसरातील सुखसागरनगर येथे पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या हल्ल्यात भरतसिंह मानसिंह जोधा राठोड (वय ४३, रा. सुखसागरनगर, कात्रज) हे गंभीर जखमी झाले आहेत. भरतसिंह हे मूळचे राजस्थान राज्यातील बिनमार तालुक्यातील रहिवासी असून सध्या ते पुण्यात वास्तव्यास आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे दहाच्या सुमारास वय २० ते २५ वर्षे असलेले तिघे तरुण दुचाकीवरून सुखसागरनगर परिसरात आले. पूर्वीच्या वादातून या टोळक्याने भरतसिंह यांच्यावर अचानक हल्ला चढविला. आरोपींनी त्यांच्या डोक्यावर व हातावर धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत परिसरात दहशत माजवली.
या हल्ल्यात भरतसिंह गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.या प्रकरणी जखमी भरतसिंह यांचे भाऊ सोमसिंह राठोड यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
त्यानुसार अज्ञात तिघांविरुद्ध हत्येचा प्रयत्न, मारहाण व दहशत निर्माण केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून संशयितांचा लवकरच छडा लावण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पुढील तपास बिबवेवाडी पोलिस करत आहेत.












