पुणे : आंबेगाव बुद्रुक येथील लेकव्हिस्टा सोसायटी परिसरात नव्याने सुरू झालेल्या पोस्ट ऑफिससमोर ड्रेनेज लाईन फुटल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या घटनेमुळे पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी, ग्राहक तसेच परिसरातील रहिवासी अक्षरशः त्रस्त झाले आहेत.
फुटलेल्या ड्रेनेज पाइपमधून घाण पाणी रस्त्यावर व परिसरात साचत असल्याने दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. विशेषतः पोस्ट ऑफिसमध्ये येणाऱ्या नागरिकांना या अस्वच्छतेचा मोठा फटका बसत आहे.
या समस्येबाबत पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही पुणे महानगरपालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. मनपा प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
दरम्यान, साई क्रेस्ट सोसायटीचे रहिवासी अमितकुमार यादव यांनी या संदर्भात पुणे महानगरपालिकेकडे लेखी तक्रार दिली असून, सोशल मीडियावरही याबाबत आवाज उठवला आहे. त्यांनी पुणे मनपा मुख्यालयातील ड्रेनेज विभाग तसेच धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाकडेही तक्रार नोंदवली आहे.
स्थानिक नागरिकांनी तातडीने दुरुस्ती करून समस्या सोडवण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. मनपा प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.












