वाई तालुक्यातील युवक वंदन नवले याची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्यंत साध्या कुटुंबातून पुढे येत वंदनने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले असून त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लहानपणापासूनच पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या वंदनने त्या दिशेने सातत्याने मेहनत घेतली. पाचवड येथील द्रोणाचार्य अकॅडमीमध्ये प्रशिक्षक अमित गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने पोलीस भरतीची तयारी केली. कठोर सराव, शिस्तबद्ध दिनचर्या आणि प्रचंड आत्मविश्वास यांच्या बळावर त्याने हे यश मिळवले.
वंदनचे संपूर्ण कुटुंब भक्ती पंथाशी जोडलेले असून त्यांच्या घराशेजारी भव्य बाळूमामांचे मंदिर उभारण्यात आले आहे. “आम्ही बाळूमामांची सेवा करतो आणि त्यांच्या कृपेनेच हे यश मिळाले,” अशी भावना नवले कुटुंबीयांनी व्यक्त केली. वंदनची मोठी बहीण पुणे येथे नोकरी करत असून संपूर्ण कुटुंबाने त्याला कायम प्रेरणा व पाठिंबा दिला.
अनेक अडचणींवर मात करत मिळवलेल्या या यशामुळे वंदन नवले हा आज परिसरातील युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे त्याने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.











