पुण्यातील बंडगार्डन परिसरात असलेल्या हॉटेल कॉनरॉड मध्ये अत्यंत शिताफीने रचलेल्या सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हॉटेलचे मालक असल्याचे भासवत व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवून सायबर चोरट्यांनी थेट फायनान्स संचालकांकडून 20 लाख 90 हजार रुपयांची रक्कम उकळली.
वरिष्ठ पदावर कार्यरत असलेला अधिकारीही या जाळ्यात अडकल्याने, कॉर्पोरेट स्तरावर सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.याप्रकरणी हॉटेल कॉनरॉडचे डायरेक्टर ऑफ फायनान्स बीपलब चक्रबोरती यांनी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.
ही घटना 8 जानेवारी 2026 रोजी घडली. त्या दिवशी सकाळी सुमारे 11 वाजता काम करत असताना बीपलब चक्रबोरती यांच्या व्हॉट्सअॅपवर एका अनोळखी क्रमांकावरून संदेश आला. हा संदेश हॉटेल कॉनरॉड आणि पाम ग्रुप बीच हॉटेल्सचे मालक संदीप रहेजा यांच्याकडून आल्याचे भासवण्यात आले होते.
“हा माझा वैयक्तिक नंबर आहे, कुणाला शेअर करू नका,” असा विश्वासार्ह मजकूर असल्याने त्यांनी तो नंबर सेव्ह केला.यानंतर आयटीसीकडून पैसे आले आहेत का, अशी चौकशी करण्यात आली. काही वेळाने आरोपींनी बँक खात्याचे तपशील पाठवत तातडीने आरटीजीएसद्वारे 20 लाख 90 हजार 601 रुपये अमर सिंग नावाच्या खात्यात पाठवण्यास सांगितले.
आपण थेट मालकाशीच संवाद साधत आहोत, असा विश्वास असल्याने आणि कॉल न करण्याच्या सूचनेमुळे शंका न घेता बीपलब चक्रबोरती यांनी रक्कम ट्रान्सफर केली.रक्कम पाठवल्यानंतर संपर्क न झाल्याने संशय बळावला. मुंबईतील कंपनी कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर मालकांनी कोणतीही सूचना दिली नसल्याचे स्पष्ट झाले आणि फसवणूक झाल्याचे उघड झाले.
तातडीने बँक आणि 1930 हेल्पलाईनवर तक्रार देण्यात आली. मात्र तोपर्यंत रक्कम दुसऱ्या बँकेत वर्ग झाली होती.या प्रकरणाचा तपास सुरू असून, सायबर गुन्हेगारांनी वरिष्ठ अधिकारी, विश्वासार्ह भाषा आणि तातडीचा दबाव यांचा वापर करून फसवणूक कशी केली, याचे हे ठळक उदाहरण मानले जात आहे.












