घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष ना. शिवेंद्रराजे भोसले उदगीर येथे १८ व १९ एप्रिलला राष्ट्रीय अधिवेशन; मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे

देशभरातील पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन येत्या १८ व १९ एप्रिल रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले कार्यभार सांभाळणार असल्याची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख आणि अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी केली. या अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली. मराठी पत्रकारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे हे अधिवेशन दर दोन वर्षांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागात आयोजित केले जाते. पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळख असलेल्या आणि ८७ वर्षांची देदीप्यमान परंपरा लाभलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाला राज्यभरातून तसेच देशभरातून पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी होतात. यापूर्वी रोहा, पिंपरी-चिंचवड, शेगाव आणि नांदेड येथे ही अधिवेशने पार पडली असून यंदाचे अधिवेशन उदगीर येथे होत आहे. अधिवेशनासाठी सध्या जोरदार तयारी सुरू आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर परिषदेच्या शिष्टमंडळाने स्वागताध्यक्ष ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि स्थानिक आमदार संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची विनंती केली.

मुख्यमंत्र्यांनी ही विनंती मान्य करत अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, लातूर विभागीय सचिव तथा अधिवेशनाचे प्रमुख संयोजक सचिन शिवशेट्टे, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे, मुंबई अध्यक्ष राजा आदाटे तसेच संयोजन समितीचे युवराज धोत्रे आदी उपस्थित होते. दरम्यान, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे वारसदार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांची मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाल्यामुळे हा सातारा जिल्ह्यासाठी सन्मान असल्याची भावना व्यक्त होत आहे. पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी सांगितले की, मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनांमध्ये सातारा जिल्ह्याचे योगदान कायम राहिले आहे. मराठी पत्रकार परिषदेचा सातारा जिल्हा हा बालेकिल्ला मानला जातो आणि सातारा जिल्ह्यातील पत्रकारिता परिषदेच्या झेंड्याखाली एकत्र ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून साताऱ्याचे सक्रिय योगदान या राष्ट्रीय अधिवेशनात राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यंदाच्या अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले उपस्थित राहणार असून देशभरातून सुमारे तीन हजार पत्रकार सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यादृष्टीने सर्व व्यवस्था करण्यात येत असून अधिवेशनासाठी उदगीर येथे कार्यालयाचे उद्घाटन देखील करण्यात आले आहे. देशभरातील पत्रकारांनी या राष्ट्रीय अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें