पाचगणी | प्रतिनिधी
पाचगणी–महाबळेश्वर परिसरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ केट्स पॉईंट येथे खोल दरीत पडून बेपत्ता झालेल्या १८ वर्षीय युवकाचा मृतदेह अखेर संयुक्त शोध व बचाव पथकाच्या अथक प्रयत्नांतून बाहेर काढण्यात आला. ही धाडसी मोहीम सह्याद्री ट्रेकर्स प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्स टीम यांच्या संयुक्त सहभागातून पार पडली.
या प्रकरणाबाबत घटना स्थळ आणि पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ढेबेवाडी येथील भगवतसिंह मदनसिंह सोलंकी (वय १८) हा युवक २३ जानेवारी रोजी घरातून फिरण्यासाठी निघून गेल्यानंतर बेपत्ता झाला होता. त्याचा मोबाईल लोकेशन केट्स पॉईंट व आजूबाजूच्या परिसरात शेवटचे सक्रिय असल्याची माहिती २५ जानेवारी रोजी ढेबेवाडी पोलिसांना मिळाली. त्यानंतर सह्याद्री ट्रेकर्सना शोधमोहीमेसाठी मदत मागविण्यात आली.
दरम्यान, २६ जानेवारी रोजी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. दरीतील घनदाट जंगल व अतिशय निसरडा परिसर असूनही, संजय पारडे यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक जाधव, सुहास बेलकर, सर्जेराव कुटेकर, जितेंद्र कदम आणि किरण चव्हाण यांनी अत्यंत धाडसाने दरीत उतरण्याचा निर्णय घेतला.
सुमारे ४०० फूट खोल दरीत उतरल्यावर युवकाचा मृतदेह आढळून आला. ट्रेकर्सनी स्ट्रेचर व रोपच्या सहाय्याने मृतदेह सुरक्षितपणे वर आणला. त्यानंतर मृतदेह पाचगणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
प्राथमिक तपासात युवकाचा मृत्यू दरीत पडल्याने झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पुढील तपास पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिलीप पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
एका उमद्या तरुणाच्या अकाली मृत्यूमुळे ढेबेवाडी, पाचगणी व महाबळेश्वर परिसरात शोककळा पसरली आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत जीव धोक्यात घालून मोहीम यशस्वी करणाऱ्या सह्याद्री ट्रेकर्स व रेस्क्यू टीमच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.











