वडगाव निंबाळकर (ता. बारामती) पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस हवालदाराने लाच मागितल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) याप्रकरणी सापळा रचून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिस हवालदार रमेश लक्ष्मण नागटिळक (वय ४२) याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे.
एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेच्या मुलाविरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने संबंधित युवकाला जामीन मिळावा तसेच या प्रकरणाची चार्जशीट लवकरात लवकर न्यायालयात दाखल करण्यात यावी, यासाठी हवालदार नागटिळक याने तक्रारदार महिलेकडे लाचेची मागणी केली होती. सुरुवातीला त्याने ३० हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराने असमर्थता दर्शवल्यानंतर दोघांमध्ये तडजोड होऊन लाचेची रक्कम २५ हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.
या लाचखोरीच्या प्रकाराला कंटाळून तक्रारदार महिलेने १८ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत एसीबीने प्राथमिक पडताळणी केली असता लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला.
शनिवारी (दि. ३१) हवालदार रमेश नागटिळक याने तक्रारदाराकडे ठरवलेल्या २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याचवेळी एसीबीच्या पथकाने छापा टाकत त्याला ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान लाचेची रक्कम स्वीकारल्याचे पुरावेही एसीबीच्या हाती लागले आहेत.
या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात आरोपी हवालदाराविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, एसीबीकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पोलिस खात्याच्या प्रतिमेला धक्का बसला असून, परिसरात खळबळ उडाली आहे.












