पुण्यातील बाणेर परिसरात अॅपवरून कॅब बुक केल्यानंतर एका महिलेचा धक्कादायक अनुभव समोर आला आहे. ओटीपी दिल्यानंतर कॅबचालकाने अचानक दुप्पट भाड्याची मागणी केली आणि त्याला विरोध केल्यावर भर दिवसा महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला.
या घटनेमुळे शहरातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.फिर्यादी महिला 42 वर्षांच्या असून, 1 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 8:45 वाजता त्यांनी घरी जाण्यासाठी Uber अॅपवरून कॅब बुक केली होती. कॅब आल्यानंतर त्या वाहनात बसल्या आणि चालकाला ओटीपी सांगितला.
त्यानंतर चालकाने प्रवासाचे भाडे 700 रुपये असल्याचे सांगितले. अॅपमध्ये मात्र भाडे 350 रुपये दाखवत असल्याने महिलेने जादा रक्कम का मागितली जात आहे, अशी विचारणा केली.यावर चालकाने वाद घालण्यास सुरुवात केली. परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच महिला कॅबमधून उतरून पायी निघाल्या.
मात्र कॅबचालक त्यांचा पाठलाग करत रस्त्यातच त्यांच्या दिशेने अश्लील हावभाव आणि वर्तन करू लागला. भर रस्त्यावर घडलेल्या या प्रकारामुळे महिला प्रचंड घाबरल्या. काही वेळानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.या घटनेनंतर महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी संबंधित उबेर कॅबचालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.












